top of page

पू लं देशपांडे आणि मी......

Writer's picture: Malhar PandeyMalhar Pandey

#पुलदेशपांडे , हे नाव ऐकताच चेहऱ्यासमोर,गोल चेहरा त्यावर भिंगाचा चौकोनी चष्मा,आणि सस्यासारखे पुढे आलेले दोन दात असलेल्या इसमाची प्रतिमा समोर उभी राहते आणि नकळत चेहऱ्यावर हास्य येतं.या नावात काय जादू आहे कोण जाणे परंतु त्यांच्या मृत्यू आधी दोन वर्ष जन्माला आलेल्या मला सुद्धा त्यांच्या बद्दल वेगळीच आपुलकी वाटते.


पाहायला गेलं तर माझं आणि पु लं चं नातं देशपांडे मधलं 'पांडे' या नावाचे साम्य सोडलं तर काही नाही परंतु मला ते कायमच माझ्या एका खोडकर पण मानाने कोवळा,वेळप्रसंगी मार्मिक सल्ले देणाऱ्या मित्रासारखे वाटले आहेत. लहानपणी कधी आजीच्या 'निवडक पुलं' या कॅसेटीतून त्यांची आणि माझी ओळख झाली होती आणि तेव्हा त्यांनी मला 'सखाराम गटणे' याची कहाणी सांगितली होती. सखाराम चे ते अवघड शब्द प्रयोग ऐकून माझीच बोबडी वळली होती खरी.त्या नंतर कधी त्यांनी मला राव साहेबांची गोष्ट सांगितली तर कधी त्यांच्या आणि त्यांच्या शत्रुपक्षाची कहाणी सांगितली.तेव्हा मला 'मी आणि माझ्या शत्रुपक्षाचे' यातल्या 'कुलकर्णी' या पत्राचे गांभीर्य कळले नव्हते, परंतु माझ्या एका 'कुलकर्णी' नावाचाच मित्राने स्वतःचे घर बांधायला काढले तेव्हा मला पु लंच्या त्या पात्राचे गांभीर्य कळले. मोठा होत गेलो तसे मला ते पुस्तकातून भेटू लागले.बटाट्याच्या चाळीत जरी राहायला नसलो तरी त्यांच्या त्या चाळीत जणू आपण राहत आहोत असे अनेकदा वाटत राहिलं.


आमच्या कॉलोनीतील लोक आणि बटाट्याच्या चाळीतील लोकांमध्ये फार साम्य आहे हे आत्ता मोठं झाल्यावर कळतं आहे. पु लं फक्त हसवत नसत,कधी कधी मार्मिक शब्दांचा हळूच मारा करून,वाचकाला हळवे करण्याची कला त्यांनी चांगलीच अंगिकारली होती.येत्या काळात TV सगळीकडे येऊ लागले आणि निवडक पुलं ची आता CD मिळू लागली, आणि दर रविवारी आईनी केलेल्या जबरदस्त नाश्त्याचा आस्वाद घेण्यासाठी पु लं आणि आम्ही TV द्वारे एकमेकांना भेटत.आईच्या हातच्या स्वयंपाकाचा आस्वाद घेत पु लंच्या शब्दांचा सुद्धा आस्वाद घेताना पोट आणि मन कधी भरून जायचं कळायचंच नाही. मी बाबा आणि आई पु लंच्या निमित्ताने एकत्र बसून पोटभर खायचो आणि हसायचो.अजून मोठं झालो,हातात मोबाईल आला, पु लं आणि माझी भेट थोडी कमी व्हायला लागली,मी माझ्या कामात व्यस्त,काम म्हणजे फार महत्वाचे नाही, पण ते whatsapp ,फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांमुळे माझी आणि त्यांची भेट कमी व्हायची. निवडक पुलं ची CD आता कुठेतरी कोपऱ्यात पडली होती.कॅसेट सुद्धा खराब झाली असावी.पण मग कोणीतरी चांगल्या इसमाने निवडक पुलं युट्युब वर अपलोड केले. त्यांची आणि माझी भेट आता पुन्हा वारंवार होऊ लागली.पुन्हा त्याच कहाण्या ऐकत होतो,सखाराम घटने,चितळे मास्टर,पेस्तन काका,राव साहेब, अंतू बरवा,म्हैस.... पण एकदाही कंटाळा नाही आला हो,एकदाही ! पु लं इतक्या सहजतेने एखाद्या विषयाला हात घालत कि ऐकत राहावंसं वाटत. राव साहेब मधला 'शिंचा' हा शब्दप्रयोग जरा माझ्याकडून जास्तच होऊ लागला म्हणून काही दिवस पु लं आणि माझ्या मैत्रीमध्ये आमच्या मातोश्रीनी खंड आणला.


पण आमची गहिरी दोस्ती,आम्ही ऐकणार होतो का एकमेकांना भेटल्याशिवाय. एकदिवस माहित नाही काय झाले पण पु लंनी अचानक मला अत्यंत मार्मिक गोष्ट सांगितली.'नंदा प्रधान' ची ! हे रूप मी पहिल्यांदाच पाहत होतो. पु लंची कथाकथन ऐकून हसणारा मी, आज नंदा प्रधान ची गोष्ट ऐकल्यावर मात्र लहानबाळासारखा रडत होतो. पु ल हे पाहू शकले नाहीत आणि लगेचच त्यांनी 'अंतू शेठ' ची कहाणी सांगायला सुरवात केली. काय हसलो माहितीये. पण या सुद्धा कहाणी मध्ये कुठेतरी अशांतता होती. अंतू शेठ चं ते पडलेलं घर, त्यांच्या त्या हास्यस्वरूपात त्यांची सांगितलेली दुःखे आणि त्यांचा अंत सगळंच मनाला भिडून गेलं. काय जादू होती ह्या माणसाच्या लेखणीत हे फक्त सरस्वती देवीलाच माहिती, पण एक मात्र निश्चित होतं जेव्हा लेखनाची कला सरस्वतीच्या हातून वाटली जात होती,तेव्हा सस्यासारखे दात असलेल्या आणि तुंदील तनु बाळाकडे पाहून तिने जरा जास्तच दिली असावी. पु लं फक्त एक विनोदी लेखक म्हणून उत्तम नव्हते,त्यांचे सावरकरांचे भाषण ऐकताच मला आश्चर्याचा धक्का बसला,कायमस्वरूपी हास्याच्या मुद्रेत असलेला हा इसम आज एवढा गंभीर होऊन कसा बोलत आहे.आणि अत्यंत अवघड शब्द वापरून हळूच स्वतःला 'शब्दकिंकर' म्हणणे म्हणजे मोठी गोष्ट आहे. भाईंच्या त्या भाषणातून मला इतकं काही शिकायला मिळालं कि सांगायला नको.राव साहेब मधले 'सारखे डिस्टरब तर करत नाई ना मी' म्हणणाऱ्या रावसाहेबांसारखा, मी सुद्धा भाईंना अनेक वेळेला मला कहाणी सांगायला आजही Disturb करतो. आजीच्या कॅसेट, ते बाबानी आणलेल्या CD पासून ते माझ्या फोन मधील एक सेपरेट प्लेलिस्ट पर्यंत भाई आणि माझी मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे. आज भाई असते तर १०१ वर्षांचे असले असते.


आणि मिश्किल पणे हसून म्हणले असते,"चला आता माझी आठवण आल्यावर कोणी म्हणणार नाही याला १०० वर्ष आयुष्य लाभो,नाहीतर हा म्हातारा अजून १०० वर्ष जगतोय कि काय असं लोकांना वाटायचं". आज भाई आपल्यात शरीर रूपात नसले तरी ते आपल्यासोबत कायमस्वरूपी आहेत. मी भाईंबद्दल तासंतास बोलू शकतो,पण स्वर्गलोकातून खाली पाहताना तेच माझं भाषण ऐकता ऐकता झोपून जातील याची मला भीती आहे. असो,मी माझी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरात सुफळ संपूर्ण करतो आणि माझ्या जवळच्या मित्राला वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा देतो. भाई तुम्ही आणि तुमच्या कहाण्या वेळेच्या शेवटापर्यंत अश्याच अजरामर राहतील याची खबरदारी तुमचे अनेक मित्र घेतील याची मला खात्री आहे ! रात्री भेटूयात ! असामी असामी सांगणार आहात ना आज ?


Pic-art Credit - @buddhist_hindu

12 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page